मुंबई : 12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी केस बी म्हणजे 93 बॉम्बस्फोटातील शेवटच्या खटल्यातील 7 आरोपी दोषी आहेत की नाही, याबाबत मुंबईतील विशेष टाडा न्यायालाय 29 मे रोजी आपला निकाल देणार आहे.


या 7 आरोपींमध्ये पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करारावर भारताला हस्तांतरित केलेला आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम, दुबईहून अटक केलेला आरोपी मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाझ सिद्धक्की, करीमुल्ला शेख आणि अब्दूल कय्युम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून 29 मे रोजी हे दोषी आहेत की नाही, हे विशेष टाडा न्यायालय स्पष्ट करणार आहे.

12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला.

12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे.

या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.