मुंबई : हैदराबाद, उन्नाव येथील मुलीवर बलात्कार आणि हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमुळे देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात भिवंडीतही अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. तालुक्यातील एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नराधमाचा शोध पोलीस घेत आहेत.
भिवंडी तालुक्यात एक कुटुंब मागील तीन वर्षांपासून इथं राहत आहे. ते मुळचे यूपी मधील देवराया येथील रहिवासी आहेत. उपजीविका भागवण्यासाठी हे कुटुंब घरातच खानावळ चालवतात. पीडित अल्पवयीन मुलगी दुसरी इयत्तेत शिकत असून ती सात वर्षांची आहे. काल रात्री दहाच्या सुमारास पीडित मुलगी ही घराबाहेर खेळत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीला आयस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिच्या घरापासून 50 मीटर दूर असलेल्या झाडीझुडपांत नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व पुरावा नष्ट करण्यासाठी शेजारी पडलेल्या दगडाने मुलीचा चेहरा ठेचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे आपली मुलगी घरी न आल्याने मुलीच्या आई-वडिलांनी शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु, रात्री उशिरापर्यंत मुलगी मिळून न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.


सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने घरापासून 50 मीटर दूर असलेल्या झुडपात मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना दिली. तसेच ही माहिती पोलीसांना कळवण्यात आली. घटनास्थळी पीडित मुलीचा मुतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसानी अज्ञाताविरोधात बलात्कार व हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

पीडित मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. नराधम मात्र मोकाट आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पीडित मुलीच्या आईने केली होती. तसेच घटनास्थळी भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व ठाणे, भिवंडी गुन्हेशाखा, डॉगस्कॉडची टीम दाखल झाली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओळखीचा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी सध्या फरार असला तरी त्याची लिंक मिळाली आहे. त्यामुळे लवकरच आरोपी पोलीसांच्या ताब्यात असेल, अशी माहिती भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. याप्रकरणी नराधम आरोपी भारत कोरी (वय 32) याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना शंभर दिवसांत फाशी? जानेवारीत प्रस्ताव आणणार : सूत्र

Anna Hazare | निर्भया प्रकरणातल्या नराधमांना फाशी द्या : अण्णा हजारे | ABP Majha