मीरा भाईंदर : मीरा भाईंदर शहरात कोरोनाचं संकट गहिरं होत असताना आता एक दिलासादायक बातमी आली आहे. आज एका दिवसात तब्बल 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून आपल्या घरी निघाले आहेत. मीरा भाईंदर शहरात आजघडीला 161 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. तर यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असं असताना आज पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे बरे होवून, आपल्या घरी गेले आहेत. आज या सर्वांना रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून डिस्चार्ज दिला. यात 2 वर्षाच्या लहानगीपासून 60 वर्षांच्या वयोवृध्दापर्यंत लोकं होती. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यावेळी पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे हे स्वतः उपस्थित होते. सध्या मीरा भाईंदर शहरात कोरोना पॉझिटिव्ह बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 एवढी झाली आहे. तर आता 57 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहे.
तीन रुग्णालयं कोविड रूग्णालयं घोषित
मीरा भाईंदर शहरामध्ये सध्या दिवसेगणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 161 एवढी झाली आहे. तर यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3झाली आहे. त्यामुळे पालिकेने कोविड-19 वर उपचार करण्यासाठी शहरात पंडित भीमसेन जोशी कोविड-19 रुग्णालया व्यतिरिक्त अन्य तीन रुग्णालय कोविड – 19 वर उपचार करणारी रूग्णालये घोषित केली आहेत. या हॉस्पिटलमध्ये वोकहार्ट, फॅमिली केअर आणि पी.बी. जोशी रुग्णालयचा समावेश आहे. या रुग्णालयात 300 बेड्सची सोय करण्यात आली आहे. तसेच सहा अन्य रुग्णालये कोविड-19 हेल्थ सेंटर ही घोषित करण्यात आली आहेत. याच्यांत शहा लाईफ लाईन, तुंगा, चिरायू, गेलेक्सी, ऑर्वीट आणि नेफ्यू या रुग्णालयांचा समावेश आहे. या सहा रुग्णालयात ही 300 बेड्सची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मीरा रोड येथील एक इमारतीला कोविड केयर सेंटर म्हणून ही घोषित करण्यात आले आहे. या इमारती मध्ये 800 रुग्णांना ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेनी ही मोठी उपाययोजना केली आहे.
दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या विरार येथील बोलींज हॉस्पिटलमधून 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पालिकेच्या एक नर्सने देखील कोरोनावर मात केली आहे. 14 दिवसाच्या उपचारानंतर बोलींज हॉस्पिटलच्या दोन्ही रुग्णांना काल सायंकाळच्या सुमारास सुट्टी देण्यात आली आहे. 31 वर्षांचा पुरुष आणि 42 वर्षांची महिलेने कोरोनावर मात केली असून हे दोघेही विरार पूर्वेकडील राहणारे आहेत. कोरोना मुक्त रुग्णांना सुट्टी मिळाल्यानंतर बोलींज विलगीकरण कक्षातील डॉक्टर, नर्स, वार्डबॉय यांनी टाळ्या वाजवून रुग्णांचे स्वागत केले. यावेळी त्यांना डिस्चार्ज कार्ड देण्यात आले. वसईत राहणारी महानगरपालिकेची नर्स ही कोरोना निगेटिव्ह झाल्यावर सोसायटी मध्ये तिथल्या लोकांनी टाळ्या आणि फुलं टाकून स्वागत केलं. एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची मुक्तता होत असल्याने वसई विरार महापालिका आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दिलासादायक... मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात 55 जणांना डिस्चार्ज
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा
Updated at:
02 May 2020 04:56 PM (IST)
सध्या मीरा भाईंदर शहरात कोरोना पॉझिटिव्ह बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 एवढी झाली आहे. तर आता 57 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -