मुंबई : मुंबईच्या धारावी विभागात अतिशय दुर्देवी घटना समोर आली आहे. एक लिफ्टच्या दरवाजात अडकून चिरडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद हुजैफा शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. धारावी क्रॉस रोड वर पालवाडीत असलेल्या कोजी इमारतीमध्ये मोहम्मद हुजैफा हा नेहमीप्रमाणे त्याच्या दोन बहिणींसोबत खेळत होता. लिफ्ट मधून तो तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यावर बहिणीसोबत गेला.

Continues below advertisement


तिथे बहिणी लिफ्टमधून उतरून पुढे गेल्या आणि लिफ्टचा ग्रील लावण्यास गेलेल्या मोहम्मद हुजैफा लिफ्ट आणि ग्रीलमध्ये अडकून पडला. याच वेळी लिफ्ट सहाव्या मजल्यावर जाऊ लागली आणि लिफ्टच्या मध्ये तो आला आणि चिरडून त्याचा मृत्यू झाला. घरच्यांनी काही वेळाने शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह चिरडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही सगळी घटना लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.