Mumbai: गेल्या शनिवारी (27 मे) मुंबईतील दादर भागात वंचित बहुजन युवक आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष परमेश्वर रणशूर (Parmeshwar Ranshur) आणि मुंबईतील वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, या प्रकरणी पोलिसांनी गँगस्टर अबू सालेमच्या शूटरसह 4 जणांना अटक केली आहे. पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) यांचा मुलगा सिद्धांत याने हल्लेखोरांना 5 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिस निरीक्षक संजय कदम यांनी त्यांच्या आईच्या अस्थींचं विसर्जन केलं आणि लगेच या प्रकरणाचा तपास करुन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 


परमेश्वर रणशूर यांच्यावर चार अज्ञातांनी चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला होता. या हल्ल्यात रणशूर गंभीर जखमी झाले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना केईएम रुग्णालयात (KEM Hospital) दाखल केलं आणि त्यांच्या वक्तव्याच्या आधारे 4 अज्ञात लोकांविरुद्ध कलम 307, 326 आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.


पोलीस निरीक्षक संजय निकम आणि त्यांच्या पथकाने ठाणे आणि दारूखाना परिसरातून 4 जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींपैकी राजेश अर्जुन हातणकर हा एक आरोपी आहे (त्याच्यावर 7 खुनांचे गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 5 प्रकरणांमध्ये पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला होता, तर 2 खटले अजूनही न्यायालयात सुरू आहेत), राजेश हा आरोपी एकेकाळी गँगस्टर अबू सालेमचा शूटर होता. कांदिवली परिसरातील विकासक विकी शर्माच्या हत्येप्रकरणी राजेश 2016 पासून तुरुंगात होता आणि 2022 मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. या प्रकरणी नजीर सय्यद, साकिब कुरेशी आणि कृष्णा यादव अशी अटक करण्यात आलेल्या उर्वरित तीन आरोपींची नावं आहेत.


का करण्यात आला हल्ला?


खरं तर परमेश्वर रणशूर आणि जगदीश गायकवाड यांच्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून तेढ निर्माण झाली होती, त्यावेळी गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे सर्वच संतापले होते. त्यानंतर रणशूर जगदीश गायकवाड यांचा शोध घेत होते आणि काही काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील चुनाभट्टी परिसरात रणशूरने गायकवाड यांना बेदम मारहाण केली होती.


सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या घटनेनंतरच परमेश्वर रणशूर (Parmeshwar Ranshur) यांना मुंबई युवक अध्यक्ष करण्यात आलं आणि जगदीश गायकवाड यांना त्यांची सर्व पदं गमवावी लागली, त्यामुळे गायकवाड यांचा मुलगा सिद्धांत चांगलाच संतापला आणि त्याने रणशूर यांना मारण्याचा कट रचला आणि त्यासाठी त्याने गुंडांना 5 लाख रुपये दिले. या संपूर्ण नियोजनात आणखी 4 ते 5 आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


या घटनेनंतर बहुजन वंचित आघाडी पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. त्यातच 3 जून रोजी मुंबईतील कुर्ला परिसरात पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा मेळावा होणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करणं आवश्यक आहे, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असं कार्यकर्त्यांनी म्हंटलं आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी यापूर्वी अनेक संवेदनशील प्रकरणांचा तपास केला आहे.


आईच्या अस्थींचं विसर्जन करुन लगेच आरोपींचा शोध


पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या आई लीलावती यांची तब्येत 25 मे रोजी खराब असल्याने निकम घरी गेले होते, त्याच वेळी त्यांच्या 83 वर्षीय आईने त्यांच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला. 26 मे रोजी निकम यांनी आईचे अंत्यसंस्कार केले आणि 28 मे रोजी आईच्या अस्थिकलशाचं विसर्जन करण्यासाठी गेले असता त्यांना वरिष्ठांचा फोन आला. या गंभीर प्रकरणाची चौकशी ते करू शकतात का? अशी विचारणा केल्यानंतर निकम तत्काळ सर्व प्रथा उरकून या प्रकरणावर काम करण्यासाठी मुंबईत आले आणि 3 दिवस शोध घेतल्यानंतर बुधवारी (31 मे) निकम आणि त्यांच्या टीमने 4 जणांना अटक केली.


हेही वाचा:


Mumbai: जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर; डॉ. तात्याराव लहानेंसह सर्व अध्यापकांचे राजीनामे