मुंबई : राज्यात एकूण तीन हजारांपेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये 1900 पेक्षा अधिक कर्मचारी बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. मात्र, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांची संख्याही वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत गेल्या चोवीस तासांमधील ही सगळ्यात मोठी आकडेवारी आहे.


राज्यात कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. देशात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि त्यातही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबई पोलीस थेट लोकांच्या संपर्कात येत आहे.


24 तासात मुंबईत 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू




  • संदेश केणी हे पोलीस नाईक पदावर रुजू असून बोरवली पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत होते. केणी हे राहायला वसईमध्ये होते. त्यांना 6 तारखेला वसई येथील स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. मात्र, कोरोनाशी लढा देत असताना ते काल मृत पावले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं आहेत.

  • हेमंत कुंभार पोलीस हवालदार म्हणून दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचं वय 51 वर्ष होतं. ते राहायला गोरेगावला होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

  • पोलीस हवालदार अनिल कांबळे हे 57 वर्षाचे होते. 30 जूनला ते निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार होता.

  • दीपक लोळे हे मुंबई पोलिसांच्या संरक्षण खात्यात तैनात होते. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणारे कर्मचारी म्हणून लोळे यांची ओळख होती.


Corona Test | खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी 2200 रुपये दर निश्चित, आरोग्यमंत्र्यांची घोषणा


मुंबई पोलीस फ्रंट लाईनमध्ये काम करत आहे. त्यामुळेच मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. मात्र, मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचा रिकव्हरी रेट हा चांगला आहे. आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. 1200 पेक्षा अधिक कर्मचारी रिकव्हर झाले असल्याचं मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितलं आहे.


मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळही ऑनलाईन मिळणार; जून अखेरपर्यंत संगणकीय प्रणाली सुरु होणार