मुंबई : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, सरकारने या निर्णयाच्या जाहिरातीवर तब्बल 36 लाख 31 हजारांची उधळण केल्याचे समोर आले आहे.

कर्जमाफीच्या घोषणेनंतर महाराष्ट्र सरकारने दोन दिवसात 51 वृत्तपत्रांमध्ये यासंबंधी जाहिरात दिली होती. या जाहिरातींवर 36 लाख 31 हजार रुपयांचा खर्च झाला. विशेष म्हणजे, यात टीव्ही वाहिन्या आणि होर्डिंग्जवरील जाहिरात खर्चाचा समावेश नाही. त्यामुळे तो खर्च आणखी वेगळा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

24 जून रोजी महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या घोषणेला आता एक महिना व्हायला आला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याआधीच जाहिरातींवर मात्र सरकारने लाखोंची उधळण केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी

राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.