मुंबई: मुंबईला डेंग्यूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईमध्ये डेंग्यूचे 136 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार होण्यात कारणीभूत ठरल्याप्रकरणी 13 हजार नागरिकांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसनंतरही योग्य पावले न उचलणाऱ्यांविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल करणार आहे.


मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सप्टेंबर 2015 मध्ये डेंग्यूचे 248 रुग्ण होते, तर या वर्षी सप्टेंबर महिन्यातच एकूण 296 डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईत डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या 3287 वर पोहचली असून यातील 80 टक्के रूग्ण 15 ते 45 वयोगटातील आहेत. मुंबईत आतापर्यंत डेंग्यूमुळं तिघांचा बळी गेला आहे.

दरम्यान, डेंग्यूच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या 927 जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. डेंग्यूच्या वाढत्या धोक्यामुळे डासशोधकांना कामात असहकार्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार, असल्याचे मुंबई महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी राजन नारींग्रेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

नाशिकला डेंग्यूचा विळखा, 555 संशयित, 185 जणांना लागण