कल्याण : कल्याणमध्ये डिझेल माफियांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कल्याण क्राईम ब्रॉंचनं ही कारवाई केली आहे. या कारवाईत 31 लाखांचं भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आलं आहे. पाच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 18 तास ही कारवाई सुरु होती. पाचही आरोपींना 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणच्या आडवली गावात बांधकाम सुरु असलेल्या गाळ्यात ही कारवाई करण्यात आली.
कल्याण ग्रामीण भागातील आडवली गावात एका बांधकाम सुरु असलेल्या गाळ्यात भेसळयुक्त डीझेल तयार केले जात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी पहाटे कल्याण क्राईम ब्रांच, रेशनिंगचे अधिकारी यांच्यासह बुधवारी पहाटे या गाळ्यावर छापा टाकला आहे.
यावेळी या ठिकाणी काही जण मिनरल टरपेंट ऑईल, बेस ऑईल आणि नारंगी रंगाचे रसायनिक द्रव्य यांचे मिश्रण करून भेसळयुक्त बायोडीझेल बनवत आहे. भेसळयुक्त डीझेल विक्रीकरता टंकर आणि पिकअप मधील टाक्यामध्ये भरत असल्याचे आढळून आले .पोलिसांच्या पथकाने तत्काळ या ठिकाणी असलेल्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटना स्थळी असलेल्या टँकर टेम्पोसह 9 हजार लिटर भेसळयुक्त डिझेल असा सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान हे पाचही आरोपी गाळा मालकाकडे काम असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले असून या गाळ्याचा मालक संदीप राणे याचा शोध पोलिस घेत आहेत. भेसळयुक्त डिझेल प्रकरणी रॅकेट कार्यान्वित असल्याचा संशय व्यक्त केला जात असून ते हे डिझेल कुणाला विकत होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.