भिवंडी: 28 जुलैला भिंवडीजवळच्या पडघा इथं झालेल्या स्फोटाचा 48 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याच्या रागातून एका प्रियकरानं दुसऱ्या प्रियकराच्या मित्राला धडा शिकवण्यासाठी गिफ्ट पाठवून डिटोनेटरचा स्फोट घडवला आहे.
खालिंग गावात राहणाऱ्या प्रसाद शेलारचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याच तरुणीसोबत प्रमोद दळवीचे प्रेमसंबंध होते. त्यामुळं दोन महिन्यांपूर्वी प्रसादचा मित्र अभिजीतनं प्रमोदला धमकावलं आणि याचाच राग मनात ठेऊन प्रमोदनं अभिजीतला धडा शिकवण्याचं ठरवलं.
एक गिफ्टमध्ये डिटोनेटर आणि फटाक्याच्या दारुचा वापर करुन एक सर्कीट तयार केलं. घरी गिफ्ट आल्यावर अभिजीतच्या आईनं ते उघडताच स्फोट झाला. ज्यात त्यांच्या हाताचा पंजा तुटला. तर चेहऱ्याला गंभीर जखम झाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी प्रमोद दळवी, सिद्धेश दळवी आणि या दोघांना मदत करणाऱ्या रोशन शेलारला अटक केली आहे. या तिघांविरोधात कलम ३०७ नुसार खूनाचा प्रयत्न आणि स्फोटक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.