आधीच पाऊस, त्यात भूकंप; पालघरमधील नागरिक भीतीच्या छायेत
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 25 Jul 2019 07:54 AM (IST)
आधीच मुसळधार पाऊस आणि त्यात भूकंपाचे धक्के यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पालघर : एकीकडे पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यातच डहाणू, तलासरी तालुक्याबरोबर पालघरमधील काही भाग आणि गुजरातच्या उंबरगावपर्यंतचा भाग भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. मध्यरात्री एकच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले. जिल्ह्यात 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आयएमडीने दिली. जिल्ह्यात रात्री 9.49 वाजता 2.4 रिश्टर स्केल, 12.33 वाजता 2.2 रिश्टर स्केल, 12.36 वाजता 1.9 रिश्टर स्केल तर 1.03 वाजता 3.8 रिश्टर स्केल त्यानंतर पुन्हा 1.06 वाजत आणि 1.12 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. धुंदलवाडी, दापचरी, तलासरी, बोर्डी, डहाणू, बोईसर, कासा, झाईपासून संपूर्ण परिसर हादरला. तासाभरात किमान 7 ते 8 भूकंपचे धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. पालघर जिल्ह्यात कालपासून (24 जुलै) पावसाने दमदार हजेरी लावली असून, आजही पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून नदी-नालेही भरुन वाहायला सुरुवात झाली आहे. यामुळे आधीच मुसळधार पाऊस आणि त्यात भूकंपाचे धक्के यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरच्या नागरिकांच्या अडचणीत आणखी भर म्हणून पावसामुळे काही ठिकाणी वीजही गायब आहे.