मुंबई: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. या चार आरोपींना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.  त्यांना आता सात दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे.


सय्यद कुरेशी, शोएब कुरेशी, शोएब बाबा, युसूफ भटका आणि अबू बकर अशी या चार आरोपींची नावे आहेत. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात हे चार फरार आरोपी दोन दशकांहून अधिक काळापासून वाँटेड होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी असल्याचे सुत्रानी सांगितले आहे. अबू बकर हे कुटुंबासह मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीट येथे राहत होते. स्फोटानंतर तो परदेशात पळून गेला असून तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. ज्यानंतर आता अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. या सर्वांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. 


सन 1993 साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडले होते. ते खालीलप्रमाणे, 



  • पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोट झालेल्या ठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले. 

  • दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट 

  • तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन

  • चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग 

  • पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार 

  • सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम 

  • सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार 

  • आठवा स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल 

  • नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा 

  • दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल

  • अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ 

  • बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल