मालगाडीवर चढून सेल्फी घेणं भोवलं, तरुण गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2017 07:30 AM (IST)
अंबरनाथ स्टेशनमध्ये मालगाडीवर चढून सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. इलाराज अनिकेत असं या मुलाचं नाव आहे. सेल्फी घेत असताना ओव्हर हेड वायरचा शॉक लागून तो खाली कोसळला.
अंबरनाथ : सेल्फी काढण्याच्या नादात एक 17 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अंबरनाथ स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यावर चढून सेल्फी काढणाऱ्या तरूणाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागून तो गंभीर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. इलाराज अनिकेत असं या मुलाचं नाव आहे. सेल्फी घेत असताना ओव्हर हेड वायरचा शॉक लागून तो खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. परिस्थिती नाजूक असल्याने त्याला पुन्हा मुंबईला रवाना करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सेल्फीच्या नादात वारंवार दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे सेल्फी घेणं आपल्या जीवावर तर बेतणार नाही ना, हे फोटो काढण्यापूर्वी एकदा लक्षात घेण्याची गरज आहे.