कल्याण : बहिणीला छेडल्याचा बनाव रचत कंपनीची रोकड भरण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याला लुटण्यात आल्याचा प्रकार कल्याण शहरात घडला होता. याप्रकरणी आज कल्याण गुन्हे शाखेनं तीन लुटारुंना अटक केली आहे.


कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. या भागातील एका कंपनीत काम करणारे शशिकांत चव्हाण हे कंपनीची 16 लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन बँकेत निघाले होते. यावेळी बँकेच्या बाहेरच तीन लुटारुंनी त्यांना हटकत अंबरनाथच्या जत्रेत माझ्या बहिणीला का छेडलं? असा प्रश्न विचारत बनाव रचला आणि त्यांना मारहाण सुरु केली.

हा प्रकार पाहून तिथे गर्दी जमताच या तिघांनी शशिकांत चव्हाण यांना गाडीवर बसवून पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात हे तिघे चव्हाण यांना आंबिवली रोडवरील निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांना मारहाण करत त्यांच्याकडे असलेली 16 लाख 13 हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले.

याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लखन रोकडे, प्रतिक अहिरे आणि योगेश राजवळ या तिघांना अंबरनाथमधून अटक केली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी 14 लाख 80 हजार रुपये आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी योगेश राजवळ हा पूर्वी शशिकांत चव्हाण यांच्याच कंपनीत काम करत होता. शशिकांत हे रोज कंपनीची मोठी रोकड घेऊन बँकेत जात असल्याची माहिती त्याला होती. त्यातूनच त्याने हा प्लॅन आखल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.