मुंबई : हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर अनेकांची धावपळ सुरु झाली. त्यातच देशभरातील एटीएम मशिन्सही दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र एटीएमचे सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणखी दहा ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील बँकांच्या एटीएम मॅनेजमेंट कंपनीचे प्रमुख नवरोझ दस्तुर यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या एटीएममध्ये फक्त 100 रुपयांच्याच नोटा भरण्यात येत आहेत. तर 2000 रुपयांच्या नव्या नोटा बँकेतून मिळत आहेत.
'एटीएम'मध्ये दोन हजारची नोट का नाही?
दोन हजार रुपयांची नवीन नोट आकाराने लहान आहे. ती एटीएम कॅसेट कॅलिबरेट करावी लागेल. प्रत्येक एटीएममध्ये जाऊन हा बदल करावा लागेल. सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणखी दहा ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे.
प्रत्येक एटीएममध्ये हा बदल करण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ लागेल. हे काम सोमवारपासून सुरु होईल. बाजारात सध्या 100 रुपयांच्या नोटांची आवश्यकता जास्त असल्यामुळे त्याच नोटा भरल्या जात आहेत.
दोन हजार रुपयांच्या नोटेसोबतच 500 रुपयांच्या नोटा भरण्यासही सुरुवात होईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने साधारण 15 दिवसांनंतर ग्राहकांना एटीएममधून पाचशे-दोन हजारच्या नोटा मिळतील.