विक्रोळीतील टागोरनगर 5 मध्ये राहणारे आई वडील आणि दोघे भाऊ असं हातावर पोट भरवणारं परब कुटुंब... अंकुश परब यांचे दोन मुलं आकाश आणि रोहित... आकाश चौदावीला डीएव्ही कॉलेजला शिकणारा तर रोहित नववीत शिकणारा.
फुल विक्री करुन घराचा गाडा हाकणारं अंकुश यांचं कुटुंब आहे. अंकुश यांना मदत म्हणून आकाश आणि रोहित नेहमीप्रमाणे आज दादरला फुलं आणायला गेले. दुर्दैवाने एल्फिन्स्टन आणि परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि त्यात रोहितला आपला प्राण गमवावा लागला.
रोहित आणि त्याचं कुटुंब हे या भागातील मनमिळाऊ कुटुंब आहे. रोहित हा उत्कर्ष गोविंदा पथकाचा सलामीचा गोविंदा होता. इथल्या रहिवाशांना रोहितच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.
परब कुटुंब हे या ठिकाणी भाड्याच्या घरात राहतं. दोन्ही मुलं आकाश आणि रोहित हे आई शुभांगी आणि वडील अंकुश यांना घरगाडा हाकण्यासाठी इथेच जवळ असलेल्या साईबाबा मंदिराजवळ बसून हार विक्री करायचे. मात्र रोहितच्या मृत्यूने आई-वडिलांचा आधार हरपला आहे.
दसऱ्यासाठी परब कुटुंबाने उत्साहाने तयारी केली होती. दसऱ्याचा मोठा उत्सव असल्याने साई मंदिरात भाविकांची गर्दी होते. म्हणून आकाश आणि रोहित हे दादरला फुल मार्केटमध्ये फुलं आणण्यासाठी गेले होते. मात्र दसऱ्याला भाविकांना फुलाची विक्री करण्यासाठी फुलं आणण्यासाठी गेलेला रोहित पुन्हा परतलाच नाही.
संबंधित बातम्या :