मुंबई : उत्तरपत्रिका घोटाळाप्रकरणी मुंबई विद्यापीठातील तब्बल 138 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसंच उर्वरित सहा अस्थायी कर्मचाऱ्यांवर न्यायालयीन सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.


 

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर उत्तरपत्रिका घोटाळ्याचं प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 

काय आहे प्रकरण?

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना लिहिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा पूर्ण सोडवण्यासाठी घरी देण्याचं विद्यापीठातील रॅकेट शनिवारी मुलुंड पोलिसांनी उघडकीस आणलं. त्यावर विद्यापीठ प्रशासना कठोर पाऊल उचललं आहे.

 

या कारवाईमुळे आता कर्मचाऱ्यांवर परीक्षा भवनात मोबाईल फोन वापरण्यास बंदी असेल. सीसीटीव्ही कॅमेरा, कंट्रोल रुम याद्वारे त्यांच्यावरही नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय परीक्षा भवनात सुरक्षा बळकट करण्यासाठी इस्राईल सरकारची मदत घेणार असल्याचंही कळतं.