मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं. आजही दहा वर्षानंतर या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत.


मुंबई पोलीस, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस, अग्निशमन जवानांनी प्राण पणाला लावत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर तुकाराम ओंबळे यांनी स्वत:चा जीव देऊन अजमल आमीर कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडलं. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं.

भारतावरील सर्वात मोठा आणि भीषण हल्ला
26/11 चा दहशतवादी हल्ला हा भारतावरील सर्वात भीषण हल्ला होता. 26 नोव्हेंबर, 2008 रोजी शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानातील दहा दहशतवादी कराचीहून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले होते. या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी सुमारे 60 तास धुमाकूळ घातला आणि या हल्ला 166 पेक्षा जास्त निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होती. मृतांमध्ये 28 परदेशी नागरिकांचा समावेश होता.

शहीद आणि मृतांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम
मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरात मॅराथॉनसह विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीही आज मुंबई हल्ल्याच्या शहीदांना श्रद्धांजली वाहतील. एबीपी माझावर आज दिवरभर 26/11 हल्ल्याबाबत कव्हरेज सुरु असेल.

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून इनाम
दुसरीकडे मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना पकडण्यासाठी अमेरिकेने 50 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 35 कोटींहून अधिक बक्षीस जाहीर केलं आहे. रिवॉर्ड फॉर जस्टिस कार्यक्रमांतर्गत आता जगातील कुठल्याही देशात 26/11 हल्ल्याशी संबंधित आणि एलईटी प्रमुख हाफिज सईद आणि जकीउर्रहमान लखवी यांच्यासह अन्य दोषींना पकडण्यास मदत करणाऱ्यांना अमेरिकेने मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.या हल्ल्यात 170 भारतीयांसह 6 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता.