मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी (Ladki bahin yojana)ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शुल्क आकारणाऱ्याविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महानगरपालिकेच्या एम /पूर्व विभागात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांकडे शुल्काची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा देखील नोंदवला आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Mahapalika) आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरातही ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. तथापि, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र महिलांकडून प्रती अर्ज 100 रुपये शुल्क खासगी व्यक्ती घेत असल्याची माहिती सहायक आयुक्त (एम पूर्व) श्रीमती अलका ससाणे यांना प्राप्त झाली. याबाबत त्यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना अवगत केले असता डॉ. शिंदे यांनी या प्रकरणी तत्काळ पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार, नागरिकांची दिशाभूल करुन पैसे उकळत असल्याप्रकरणी देवनार पोलिस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात आज (दिनांक १५ जुलै २०२४) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
यासंदर्भात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना देणे तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 



‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. मुंबई महानगरातील अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. 


योजनेच्या अर्जासाठी पैसे देऊ नका, कुणी मागितल्यास प्रशासनाला कळवा: डॉ. सुधाकर शिंदे


महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र महिलांकडून ऑनलाइन अर्ज भरुन घेतले जात आहेत. शिवाय, विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रावरही (सीएफसी) ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नागरिकांनीही या योजनेसाठी अर्ज करण्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची रक्कम कुणालाही देऊ नये. तथापि, कुणी व्यक्ती किंवा संस्था याबाबत शुल्काची मागणी करत असेल तर त्यांच्याबाबत संबंधित विभाग कार्यालयास कळवावे, असे आवाहनही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.