नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी हा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या केला आहे.
सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बॅंकेने या बँकेचे ऑडिट केले त्यावेळी कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचं समोर आलं. कर्नाळा बॅंकेत गेल्या 8 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेनामी खातेदारकांच्या नावाने खाते उघडून यात कोट्यवधी रुपयांची कर्जरुपी रक्कम जमा करुन ती आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये विवेक पाटील यांनी वळवल्याचं भाजपा नेत्यांकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
किरीट सोमय्या, भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचं सांगितलं. विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली. या खात्यांत 700 कोटी रुपयांवर रक्कम कर्जरुपी टाकण्यात आली. तेथून ती रक्कम विवेक पाटलांच्या मालकीचे असलेले कर्नाळा स्पोर्टस क्लब आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये या वळती करून हडप करण्यात आली आहे, असा आरोपी भाजप नेत्यांनी केला.
याबाबत त्वरित ईडीमार्फत विवेक पाटील आणि कर्नाळा बॅकेच्या अधिकारी, संचालकांच्या चौकशा करुन त्यांना अटक करण्याची मागणी किरीट सोमयांनी केली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बॅंक डबघाईला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी पणाला लागल्या आहेत. ईडीने लवकरात लवकर विवेक पाटील यांची संपत्ती जप्त करुन खातेदारकांना पैसे परत द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाळा बॅंकेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून अनियमितता झाली असल्याचं विवेक पाटील यांनी सांगितलं. राजकीय विरोधापोटी आपल्यावर आरोप होत असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.