Mumbai News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असताना राज्याच्या राजधानी मुंबईमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असं मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय ६१ वर्ष इतकं होतं. तर त्यांचा मुलगा विशाल धोत्रे जो आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेलं, पण वाटेतच मृत्यूने गाठलं
पुढे आलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धोत्रे हे कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते. त्यामुळे ते मतदारसंघातील असल्यामुळे आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक 408 मध्ये ते थांबले होते. दरम्यान 7 एप्रिलच्या मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला, पण ती वेळेत उपलब्ध झाली नाही. परिणामी आमदार निवासनजीक असणाऱ्या पोलिसांच्या 2 नंबरच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे घोषित केलंय.
दरम्यान, चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे कुठलीही पोलिसी कारवाई झालेला नाही. सध्या धोत्रे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आमदार निवास परिसरात वेळेत रुग्णवाहिका मिळू न शकल्याने अनेक प्रश्न ही उपस्थित केले जात आहे.
कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी दाखल महिलेचा मृत्यू
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्ती धाम रुग्णालयामध्ये एका तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात नातेवाईकांनी या महिलेले दाखल केले होते. दरम्यान काल दुपारी तीन वाजता ऑपरेशन करण्यासाठी शांतीदेवी मौर्या यांना डॉक्टरांनी भुलीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि परिस्थिती नाजूक झाल्यानंतर डॉक्टरांनी एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना हलवण्यासाठी ॲम्बुलन्स मागवली.
दरम्यान, खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी घेऊन जाताना या महिलेचा रस्त्यात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये सुविधा नसतानाही महिलांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रिया दरम्यान एखादी महिला सिरीयल झाली तर तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे आता पुढे आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या