Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो (Mumbai Metro) रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गावरील मुंबई सेंट्रल (Mumbai Central) स्थानकावर काल (बुधवारी) 42व्या प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार पडला आहे. यामध्ये 558 काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. दरम्यान, आतापर्यंत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गावरील भुयारीकरणाचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. एकूणच मुंबई मेट्रो-3 या प्रकल्पाचे एकूण 76.6% काम पूर्ण झालं आहे. तसेच, मुंबई सेंट्रल स्थानकात भुयारीकरणाचा अंतिम टप्पा पार पडला आहे. 




मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर काल (बुधवारी) 42व्या प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार पडला आहे. अपलाईन मार्गावरील या भुयारीकरणास एकूण 43 दिवसांचा कालावधी लागला आहे. यामध्ये 558 काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. मेट्रो-3 मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-3 मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-3 अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची 837 मीटरच्या सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचं काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-1 ने यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. 


"आज मेट्रो-3 च्या भुयारी मार्गाचे काम 100 टक्के पूर्ण झालं. या क्षणाचे साक्षीदार होताना याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा मार्ग मुंबईच्या ऐतिहासिक वारसा इमारती, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी आणि कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून आणि अगदी जवळून जात असल्याने मेट्रो-3 साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते", असे मत मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.


"आम्ही कामगारांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता आधुनिक तंत्रज्ञान वापरले.  प्रकल्प सल्लागार कंत्राटदार मुं.मे.रे.कॉ. च्या संपूर्ण टीमसाठी हे एक जिकिरीचे काम होते. मेट्रो-3 हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल",असं मत मुं.मे.रे.कॉ.चे संचालक (प्रकल्प) श्री. एस.के. गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे.