पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं शिवप्रेम हे सर्वश्रुत आहेच. त्याचीच परिणीती आज पुन्हा एकदा आली. निमित्त होतं, पुण्याच्या कुंभारवाड्यात मातीचे मावळे खरेदी करण्याचं. दस्तुरखुद्द अमोल कोल्हे स्वतः मावळे खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. नारायणगाव येथील घरी खासदारांचा मुलगा, मुलगी आणि पुतण्याने किल्ला साकारलाय. या तिघांनी मातीचे मावळे आणायचा हट्ट धरला होता. खासदारांनी तो पूर्ण केल्याने आज घरच्या किल्ल्यावर हे मावळे विराजमान होणार आहेत. हे मावळे खरेदी करताना खासदारांना त्यांच्या लहानपणींचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि त्या आठवणींना त्यांनी फेसबुकवर मोकळी वाट करून दिली.


खासदार कोल्हे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांच्या भेटी घेऊन, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घरातून बाहेर पडत होते. तेव्हा मुलगी आद्या, मुलगा रुद्र आणि पुतण्या अद्वैतने किल्ल्यावर आज मावळे विराजमान व्हायला हवेतच, असा हट्ट धरला. घरी येताना आमच्या किल्ल्यासाठी मावळे घेऊन या, असा जणू आदेशच या तिघांनी खासदारांना केला. खासदारांनी देखील तिघांची मागणी पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आणि ते घरातून बाहेर पडले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मान्यवरांच्या भेटी घेऊन, दिवाळीच्या शुभेच्छा देताना खासदारांना 'ते' आश्वासन विसरून चालणार नव्हतं. त्यामुळेच ते पुण्यात गेले तेंव्हा त्यांची गाडी थेट कुंभारवाड्यात गेली. तिथं दस्तुरखुद्द कोल्हे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी मातीचे मावळे खरेदी केली. खासदारांना पाहून बाजरात अनेकांनी गर्दी केली, नेहमीप्रमाणे सेल्फी आणि फोटो निघाले. अन् तिथून पुढचा प्रवास सुरु झाला. खासदार कोल्हे काही मिनिटंचं कुंभारवाड्यात गेले पण तेवढ्या वेळेत, त्यांचं लहानपण त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्या आठवणींना लागलीच त्यांनी फेसबुकवर मोकळी वाट करून दिली.


खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट


लहानपणी दिवाळसणात एक आणखी सोहळा असायचा तो किल्ला बनवण्याचा! दगड माती आणून घराच्या अंगणात किल्ला बनवायचा आणि किल्ला छान झाला की मातीची चित्र आणून देणार असं आई वडिलांचे म्हणणं असायचं. अगदी किल्ले प्रदर्शनात असतात तसा देखणा किल्ला नाही बनवता आला कधी परंतु "छान झालाय. चला मावळे घेऊन येऊ " अशी आईवडलांची शाबासकी नक्की मिळायची. कदाचित एक 'शिवसंस्कार ' बालमनात रुजतो आहे त्याला प्रोत्साहन असावं... आणि एकदा किल्ल्यावर आले की मग ते मावळे दिवाळी पुरते उरायचे नाहीत... वर्षभराचे सवंगडी व्हायचे.. अगदी एखादं चित्र तुटलं तर भाताच्या शिताने त्याचं ऑपेरेशन करण्यापासून ते पुन्हा रंगरंगोटी करण्यापर्यंत. पण दर वर्षी त्या संख्येत भर पडली पाहिजे हा हट्ट मात्र कायम असे.

आज माझ्या मुलांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी मातीची चित्र घेत फिरताना अनेक बालगोपाळ भेटले, पालक भेटले.. किती वर्ष उलटली तरी तोच उत्साह, तीच भावना.. चित्रांचाही चेहरामोहरा बदलतोय.. कुठे बारा बलुतेदार, कुठे संभाजी महाराज तर कुठे फायबरचे वाटावेत एवढे सुबक खरे कपडे चढवलेले मावळे... नकळत मन बालपणात फेरफटका मारून आलं... परतल्यावर समाधान कायम होतं... शिवसंस्कार अजूनही रुजतो आहे...वाढतो आहे...अंगणात, सोसायटीत बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक किल्ल्यासरशी एक बुरुज बांधला जातो आहे... शिवसंस्काराचा!