Mosque Loudspeaker Mumbai : राज्यासह मुंबईतील मशिंदींवर असलेल्या भोंग्याच्या (Loudspeakers In Mosques) मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, अबू आझमी, नवाब मलिक, झीशान सिद्दीकी, सना मलिक या बैठकीस उपस्थित होते. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केलाय. तर किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा दावा ही मुस्लिम संघटनांकडून करण्यात आलाय.
दरम्यान, या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) मशिदीत जाऊ नये, असं स्पष्ट शब्दात सांगितलंय. त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री म्हणालेत.
आजच्या बैठकीत नेमकं काय झालं?
सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये, असं स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री म्हणालेत. बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेली 46 ते 56 डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही, याच प्रात्याक्षिक दाखवलं. बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील 46 डेसिबल पेक्षा जास्त आहे. याचं प्रॅक्टिकल देवेन भारती यांनी अजित पवारांना दाखवलं. अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.
....तर त्याला किरीट सोमय्या जबाबदार असतील
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की मुंबईत 1500 भोंगे उतरवण्यात आले आहेत. मुस्लिम संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात आली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि याला किरीट सोमय्या जबाबदार असतील. असेही मुस्लिम संघटनांकडून यावेळी सांगण्यात आलं.
अजित पवार यांच्याशीच चर्चा का?
महायुती सरकारमध्ये मुस्लिम समाजासाठी आश्वासक चेहरा म्हणजे अजित पवार अशी धारणा मुस्लिम संघटनांची आहे. महायुती सरकारमध्ये असूनही अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला अंतर दिलं नाही. विशाळगड येथील मुस्लिमांची घरं पाडणे असेल, सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील एका मुस्लिम तरुणाच्या हत्येचा मुद्दा असेल किंवा मीरा रोडच्या दंगल असो, अजित पवारांनी मुस्लिम समाजाच्या बाजूने घेतलेली भूमिका ही धर्मनिरपेक्ष विचारधारेची होती. त्यामुळेच आता भोंग्याच्या मुद्द्यावर अजित पवार न्याय देतील असा विश्वास मुस्लिम संघटनांना आहे. सरकारमधील मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याकडून आपणास अपेक्षा नाही असं मुस्लिम संघटनांनच म्हणणं आहे.
ही बातमी वाचा: