पुणे : राज्यात मान्सूनच्या दमदार हजेरीसाठी आणखी 24 तास वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. अरबी समुद्रातंलं वातावरण अनुकूल नसल्याने कमी दाबाचा पट्टा पुढे सरकरण्यात अडचणी येत आहेत.


पावसाने जूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पाऊस नाही. तर कोल्हापुरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण सध्या पावसाने तिथेही ओढ दिली आहे. जून महिन्यात इथे सरासरी 337 मीमी पाऊस पडतो, पण आतापर्यंत फक्त 63 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त 16 टक्के पेरणी झाली आहे.

ज्यांनी पेरणी केलीय ते शेतकरी आता पावसाची अतुरतेने वाट पाहत आहेत. तर तिकडे चंद्रपुरातही अशीच स्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त 35 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

या अत्यल्प पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडेल या आशेने कापसाची लागवड आणि सोयाबीनची पेरणी केली होती, ते आता चांगलेच संकटात सापडण्याची शक्यता आहे.