नवी दिल्ली : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून 43 वर्षीय इसमाने तिची चाकून 35 वेळा भोसकून हत्या केली. राजधानी दिल्लीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे, तर आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलावरही आरोपीने वार केले.

पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी विनोद बिष्ट याला पोलिसांनी दिल्लीच्या दिलशाद गार्डन परिसरातून अटक केली आहे. विनोद आणि रेखा यांच्या लग्नाला 16 वर्ष झाली होती. मात्र आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याला होता.

काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीच्या फोनवर काही मेसेज वाचल्यामुळे त्याचा संशय बळावला होता. एप्रिल महिन्यात त्याने पत्नीला परपुरुषाशी फोनवर बोलताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची.

याच संशयातून विनोदने 36 वर्षीय रेखावर सुरीने सपासप वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. आईच्या बचावासाठी मध्ये पडलेल्या 15 वर्षांच्या विनीतच्या हातावरही त्याने वार केले. त्यांचा 7 वर्षांचा धाकटा मुलगा संचित आजोळी गेला होता.