Political Heat Rises As MNS Targets Builder: गेल्या काही महिन्यांपासून मराठी विरूद्ध अमराठी या वादामुळे मुंबईचं वातावरण चिघळलं होतं. दरम्यान, पुन्हा एकदा मराठी विरूद्ध अमराठी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या मराठी तरूणाला त्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर, शिवीगाळ करून मारहाणही करण्यात आली असल्याचं मराठी तरूणानं सांगितलं. या प्रकरणानंतर तरूणानं पोलीस ठाण्यात धाव घेत रहेजाविरोधात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणात मनसेनं उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या संबंधित मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
गजानन काळेंची पोस्ट व्हायरल
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्यावर एका मराठी तरूणाने गंभीर आरोप केल्यानंतर खळबळ उडाली. रहेजाने मराठी तरूणाला "तुम घाटी लोग कभी सुधरेगा नहीं", असं म्हणत तरूणाला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच मारहाणही केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मराठी लोकांनी रोष व्यक्त केला. या प्रकरणात मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनीही पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "गजानन काळे. मनसे प्रवक्ते... “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत…मुंबईतील बिल्डर सुशील रहेजाकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची … केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे…आता पाहूया आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो …मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण… या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत …!!! बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच…!!!", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या गजानन काळे यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सुशील रहेजा याच्या कार्यालयात एक मराठी तरूण कामाला आहे. तक्रारदार व्यक्ती रहेजा याच्या डॉ. सी जी गिडवाणी रोड, रहेजा होम्स, तसेच चेंबूर येथील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी मीटिंग होती आणि रहेजाने तक्रारदाराला कागदपत्रे जोडून स्टॅपल लावण्यास सांगितले. दरम्यान, या कामात चूक झाल्याने, या क्षुल्लक कारणावरून रहेजाने मराठी तरूणाला झापले. तसेच "तुम घाटी लोग कभी सुधरेगा नहीं" असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.
या घटनेनंतर तक्रारदार व्यक्तीने गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच रहेजाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे रहेजाविरोधात कलम 115 बीएनएस 2023 सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) 1989 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.