मुंबई : कॉलेजच्या ऑनलाईन प्रवेशात स्थानिक विद्यार्थ्यांना त्या त्या परिसरातील स्थानिक कॉलेजमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे.
“विद्यार्थ्याना स्थानिक कॉलेजमध्ये प्रवेश दिला पाहिजे. ऑनलाईन प्रवेशात स्थानिकांना 25 टक्के आरक्षण दिले गेले पाहिजे.”, असे आमदार राज पुरोहित म्हणाले.
“विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांपासून दूर जावे लागते. कारण एका गुणाचा जरी फरक पडला तरी दूर प्रवेश मिळतो. ही मुले मध्यमवर्गीय, गरीब घरातील असतात. यासाठी बस, टॅक्सी, लोकल ट्रेनचा प्रवास करावा लागतो. प्रवासात 3 ते 4 तास जातात. मग काय अभ्यास करणार? मानसिक त्रास आणि दबाव सहन करावा लागतो.”, असेही पुरोहित म्हणाले.
त्याचबरोबर, ऑनलाईन प्रवेश पद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे. स्थानिक विद्यार्थ्यांसाठी वेगळे ऑनलाईन प्रवेश दिले गेले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी आमदार राज पुरोहित 4 जुलैला आझाद मैदानात लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत.