नागपूरः ऑफलाइन होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये दोन केंद्रांवर गैरप्रकार सुरु होता. त्यामुळे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले. तसेच सदर परिसरातील अटलांटा  महाविद्यालयाचे केंद्रच रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.


पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात बीएससी अभ्यासक्रमांच्या पेपरमध्ये गैरप्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी धडक कारवाई करत, दोन्ही पेपर रद्द केले. तसेच अटलांटा महाविद्यालयाचे केंद्र रद्द केल्याची कारवाई केली.


विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरु आहे. यावेळी ऑफलाइन बहुपर्यायी (MCQ) प्रश्न देण्यात आले असून गृह केंद्रच असल्याने विद्यार्थ्यांचे फावत आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांचे पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात वीज पुरवठा खंडीत झाल्याने फिजिक्स आणि झुलॉजी या विषयाचा सहाव्या सत्राच्या पेपरच्या झेरॉक्स काढण्यास उशिर झाला. त्यामुळे हा पेपर विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपपवर आला. त्यातून प्रश्नांच्या उत्तरांची देवाण घेवाण झाल्याची माहिती समोर आली.


त्यातून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्या पथकाने सिंधू महाविद्यालयात धडक दिली. यावेळी तेथील केमिस्ट्रीच्या पेपरदरम्यान तीन जणांकडे मोबाईल आढळून आले. यावेळी तिन्ही विद्यार्थ्यांचे पेपर जप्त करण्यात आले. याशिवाय मंगळवारी या केंद्रावर घेण्यात आलेले दोन्ही पेपर रद्द करीत हे दोन्ही प्रकरणे परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आली.


प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्सही बाहेरून


दुसरीकडे सदर येथील अटलांटा महाविद्यालयात पथकाने भेट दिली. यावेळी बीसीसीए आणि बि.कॉम अभ्यासक्रमातील सहाव्या सत्राच्या परीक्षा असता तिथे कुठल्याच प्रकारच्या सोयी-सुविधा नसल्याची बाब समोर आली. प्रश्नपत्रिका बाहेरून झेरॉक्स काढून आणत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर तत्काळ या केंद्राची मान्यता रद्द करीत, तेथील विद्यार्थ्यांना उद्यापासून अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.


विद्यार्थ्यांना पाठविले परत


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये वसंतराव नाईक शासकीय कला व समाविज्ञान महाविद्यालयामध्ये संस्कृत विषयाची परीक्षा दुपारच्या सुमारास होती. पदव्युत्तर संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाची आज परीक्षाच नाही म्हणून परत पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये वेळापत्रक आणि परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, असा आरोप परीक्षार्थिंनी केला.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI