Mira Bhayandar : मिरा-भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला कचरा जमा करण्यासाठी तब्बल 70 हजार रुपये प्रति नग किंमतीचे 500 डब्बे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय, साडेनऊ लाख रुपये प्रति नग किंमतीचे 21 ऑटोमॅटिक डब्बेही खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 3,889 डब्ब्यांच्या खरेदीसाठी जवळपास 19 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, महापालिकेने यास नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र   सोन्याच्या दरा इतक्या महागड्या कचऱ्याच्या डब्ब्यांची खरेदी होणार असल्यामुळे शहरात सर्वत्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेच्या तिजोरीतून 19 कोटी रुपयांची तरतूद

शहरातील स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी कचरा कुंड्या उभारल्या आहेत. तसेच, गृहसंकुलांतून कचरा गोळा करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या क्षमतेचे कचरा डब्बे बसवण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत हे डब्बे खराब झाले असून अनेक ठिकाणी ते मोडकळीस आले आहेत. त्यामुळे नव्याने डब्बे बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून 19 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशातच डब्बे खरेदीसाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. त्याअंतर्गत 'कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये एकूण 3,889 डब्बे खरेदी करण्यात येणार आहेत. प्रशासनाने याबाबतचा ठरावही नुकताच मंजूर केला आहे.

कचऱ्याच्या डब्ब्यांच्या खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा?

मात्र कंत्राटदाराने सादर केलेले दर पाहता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विशेषतः, स्टेनलेस स्टील पावडर कोटेड बिन्ससाठी प्रति नग किंमत ही 66, 183 इतकी दाखवण्यात आली आहे. तर स्टेनलेस स्टील-अ‍ॅल्युमिनियम कोटेड बिन्ससाठी ही किंमत 69,668 आहे. याशिवाय, ऑटोमॅटिक डब्ब्याची किंमत तब्बल 9,34,560 प्रति नग असून, फायबर डब्ब्याची किंमत 34, 551 प्रति नग अशी नमूद करण्यात आली आहे. या दरांशी तुलना करता, समाजमाध्यमांवर व विविध व्यावसायिक पोर्टल्सवर उपलब्ध असलेल्या बाजारभावानुसार हे दर 7 ते 8 पट अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेत कचऱ्याच्या डब्ब्यांच्या खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा होणार असल्याचे आरोप सध्या जोर धरू लागले आहेत.

डब्ब्याच्या सुरक्षेचे काय? 

मिरा-भाईंदर शहरात पाच वर्षांपूर्वीच महापालिकेने कचऱ्याचे डब्बे आणि नव्या कचरा कुंड्या उभारल्या होत्या. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र सध्या या कचराकुंड्या मोडकळीस आल्या असून, डब्ब्यांची स्थितीही अत्यंत दयनीय झाली आहे. दरम्यान, आता महापालिकेने साडेनऊ लाख रुपये प्रति नग किंमतीचे नवे ऑटोमॅटिक डब्बे शहरात बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एवढ्या महागड्या डब्ब्यांची सुरक्षा कशी आणि कोणाच्या जबाबदारीने केली जाणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महापालिकेने मंजुर केलेल्या डब्ब्याच्या खरेदी

डब्बा                         संख्या   प्रति नग दर  एकूण खर्च 

स्टेनलेस स्टील- 2 बिन   500      66,183        3, 30, 91, 500 स्टेनलेस स्टील -3 बिन   500      69,668        3, 48, 44, 000 ऑटोमॅटिक डब्बे            21  9, 34, 660       1, 96, 25, 760फायबर डब्बे           2, 868      34, 518       9, 99, 78, 480 

प्रशासकीय अधिकारी गोंधळात

मिरा भाईंदरमध्ये नव्याने कचरा डबे खरेदी करण्यासाठी महापालिकेने मंजूर केलेल्या ठरावाबाबत पत्रकारांनी  विचारणा करण्यात आली असता, महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी याबाबत सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. तसेच बाजारभावापेक्षा अधिक दराने डबे खरेदी केले जात असतील, तर यासंदर्भात माहिती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.याशिवाय, घनकचरा विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांना देखील डब्यांच्या प्रति नग किंमतीबाबत विचारले असता, त्यांनी प्रत्यक्ष दर कमी असून ठरावात नमूद दरांची माहिती घेतली जाईल, असे सांगितले.

हे ही वाचा