मुंबई : राज्यातील गरजू पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण, कला, क्रीडा, संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे, यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी 'प्रतिबिंब प्रतिष्ठान' (Pratibimb Foundation) आवश्यक ते सहाय्य करणार आहे. विशेष गुणवत्ता व नैपुण्य असणाऱ्या मुला-मुलींच्या पालक पत्रकारांनी आपले सहाय्य मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले आहे. राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबांच्या हिताचा चंद्रकांतदादा पाटील यांनी विचार करुन केलेल्या सूचनेनुसार प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. खऱ्या गरजू पत्रकारांच्या कुटुंबांचे हित जपण्याचा प्रयत्न पारदर्शी कार्याने करेल, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी म्हटले आहे.
राज्यातील गरजू व पात्र पत्रकारांना आवाहन
पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी देखिल या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांना मदत केली जाणार आहे. पत्रकारांच्या मुला-मुलीचे कला, क्रीडा, संशोधन या क्षेत्रातील करिअर घडविण्यास मदत करण्याबरोबरच मुलींच्या शिक्षणासाठी अधिक भर प्रतिष्ठान देत आहे. राज्यातील गरजू व पात्र पत्रकारांनी आपल्या पाल्यांचे मागणी प्रस्ताव दि. 5 मे 2025 पर्यंत आपल्या विभागातील डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाच्या शिफारसीसह पाठवावे. असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी pratibimbapratishthan1@gmail.com या ईमेल आयडीवर तसेच 9922928152 या व्हॉट्सॲप नंबरवर अर्ज पाठविण्याचे आवाहन ही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी केले आहे.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनंतर उपक्रम
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर येथे गतवर्षी झालेल्या अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणारे प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली होती. लोकवर्गणीच्या माध्यमातून हे प्रतिष्ठान सक्षम करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबांच्या हिताचा चंद्रकांतदादा पाटील यांनी विचार करुन केलेल्या सूचनेनुसार प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. खऱ्या गरजू पत्रकारांच्या कुटुंबांचे हित जपण्याचा प्रयत्न पारदर्शी कार्याने करेल, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या