उध्वस्त आयुष्याची, विस्कटलेल्या व्यवस्थेची लांबी-रुंदी आणि खोली काही सेकंदातच सांगणारा #म्होरक्याचा ट्रेलर जरूर पाहा, असं या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करताना म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येत असलेल्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एका मेंढपाळ समाजातील मुलाची परेडसाठीची धडपड दिसून येत आहे. यातून समाजव्यवस्थेतील काही गोष्टीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. जो म्होरं (पुढं) नेतो तो म्होरक्या ही या सिनेमाची टॅगलाईन आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कुठलीही बडी स्टारकास्ट नसलेल्या या सिनेमाची सध्या सोशल माध्यमावर बरीच चर्चा आहे.
इथे पाहा ट्रेलर
आनंद शिंदे यांनी पहिल्यांदाच गायलं रॅप
लोकसंगीताचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे आणि आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना थिरकायला भाग पाडणारे गायक आनंद शिंदे या चित्रपटाच्या निमित्ताने नव्या अंदाजात पाहायला मिळाले आहेत. त्यांनी या सिनेमासाठी पहिल्यांदाच रॅप पद्धतीचं गाणं गायलं आहे.
या गाण्याविषयी बोलताना आनंद शिंदे म्हणाले की, हे अशा प्रकारचं गाणं मी पहिल्यांदाच गायलं आहे. मी लोकगीतं, भीमगीतं आणि अनेक गाणी गायली. हे गाणं लोकगीत असताना देखील वेगळं काहीतरी या गाण्यातून मिळत आहे. या गाण्यातून वेगळा आनंद मला मिळाला आहे. हा मान मला मिळाला आहे याबद्दल मी म्होरक्या टीमचा आभारी आहे. पोपटापासून आतापर्यंत प्रेम दिलं तसंच या गाण्यालाही द्या असं आवाहन आनंद शिंदे यांनी केलं आहे. कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी हे गीत लिहिलं आहे तर संगीत वैभव शिरोळे यांचं आहे.
हेही वाचा- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पोस्टाने घरपोच, 'म्होरक्या'च्या दिग्दर्शकाने पोस्टमनचे केले आदरातिथ्य
या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत.
गेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी देशातील अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंत्र्यांच्या हातून घेण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुरस्कार देणार हे कळल्यानंतर अनेक लोकांनी हे पुरस्कार त्यावेळी नाकारले होते. त्या सर्वांना भारत सरकारने पोस्टाने पुरस्कार पाठवून दिले होते. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी पुरस्कार न स्वीकारणाऱ्यांमध्ये अमर देवकर हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे देवकर यांचा म्होरक्या हा पहिलाच चित्रपट असून त्यांच्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार न स्वीकारल्याने त्यांना हे पुरस्कार अखेर पोस्टाने घरपोच मिळाले होते यावेळी त्यांनी पोस्टमन राहुल पवार यांचा भरपोशाख देऊन सन्मान केला होता.