मुंबई : दुबई हे जगातील निर्यात वाढीसाठी असलेलं महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणाहून आजूबाजूच्या विविध देशात आपण निर्यात करू शकतो आणि आपल्या व्यवसायाचा विस्तारही करू शकतो. मुंबईतील उद्योजकांना त्यांचा उद्योग व्यवसाय वाढीसाठी संधी निर्माण व्हावी, बी 2 बी च्या माध्यमातून जॉइंट व्हेंचर उद्योग सुरू व्हावेत या उद्देशाने दुबई इथल्या मराठी उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रिकल्चर व गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी दुबई इथं महाबीज परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र चेंबरने राज्यात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी महाराष्ट्रात दोन वेळा ग्लोबल महाराष्ट्र परिषदेचं आयोजन केलं होतं. अशा प्रकारच्या परिषदेमध्ये प्रथमच दुबईत आयोजन करीत आहे. महाबीज परिषदेचे हे चौथे पर्व आहे . यापूर्वी तीन परिषदा गल्फ बिजनेस फोरमने आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्र चेंबर प्रथम यात सहभागी होत आहे.


जून 2019 मध्ये मलेशियात संपन्न झालेल्या मलेशिया फूड अॅन्ड बेव्हरेजेस एक्जीबिशनला भेट देण्यासाठी 120 व्यवसायिक आणि उद्योजकांचे प्रतिनिधी मंडळ नेले होते. अनेक व्यावसायिकांना या ठिकाणी व्यापार उद्योगाच्या संधी मिळाल्या. याच धर्तीवर फेब्रुवारी 2020 मध्ये दुबई इथं होत असलेल्या महाबीज 20 20 परिषदेस 250 प्रतिनिधी घेऊन जाण्याचा मानस चेंबर्सचा आहे. महाबीज परिषदेस इतर देशातील 250 हून अधिक उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक आपले व्यवसाय केवळ देशांमध्ये करताहेत. त्यांचे उद्योग इतर देशांमध्ये जावेत, उद्योगांमध्ये अधिक भर व्हावी आणि त्याचा फायदा त्यांना आणि देशालाही व्हावा यासाठी नेहमीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री प्रयत्न करत असते. गेल्यावर्षी आम्ही दुबईत भरवण्यात आलेल्या महाबीज एक्सपोसाठी महाराष्ट्रातून 100 हून अधिक उद्योजक सहभागी झालो होतो. आमच्यासोबत उद्योगांमध्ये येऊ घातलेले नवे उद्योजक आणि महिलाही सहभागी झाल्या होत्या. या परिषदेला गेल्यामुळे जगभरातील इतर उद्योजकांच्या गाठीभेटी झाल्या. नवनवीन उद्योगांच्या कल्पना समजल्या आणि चाळीसहून अधिक नवोदित उद्योजकांनी आपले उद्योग ही सुरू केलेले आहेत. त्यामुळे या परिषदेचा फायदा उद्योजकांना बरोबरच नवीन उद्योगात येऊ पाहणाऱ्या तरुणांनाही होत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली आहे.