जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पाचव्यांदा उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जुंपल्याचे दिसून येत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी दरेकर-भुजबळांना थेट इशाराच दिला आहे. दरेकर-भुजबळांचं रक्त एक झालंय, माझं उपोषण संपू द्या, सगळ्यांचा हिशोब घेतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


काल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही मॅनेज होत नाहीत म्हणून समाज पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला कुणी बोललं तर त्याला शिव्या देणं बंद केलं पाहिजे. आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नावर फोकस करा. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असे सवाल त्यांनी मनोज जरांगेंना विचारला होता.  


माझं उपोषण संपू द्या, सगळ्यांचा हिशोब घेतो


यावर मनोज जरांगे पाटील यांना पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला असं वाटतं छगन भुजबळ आणि त्यांचे रक्त एक झालं आहे. कारण छगन भुजबळ यांची सुद्धा भाषा तशीच होती. फक्त माझं उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, माझ्या समाजासाठी मी उपोषण करतोय. माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव मराठ्यांच्या नेत्यांना नाहीये. त्यांना हेच माहित नाही की, उपोषण केल्याने काय हाल होतात? आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजाचे काय हाल होतात? परत एकदा सांगतो उपोषण संपू द्या, ते जे जे काही बोलले त्या सगळ्यांचा हिशोब घेणार, असेही त्यांनी म्हटले आहे.


तीनही गॅजेट लवकरात लवकर लागू करा


ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे मी खरंच कौतुक करतो. मी इथून मागे सुद्धा सांगत होतो की, मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात ते फक्त एकनाथ शिंदे साहेबच. म्हणून सांगतो आरक्षण लवकर द्या, तुम्ही उशीर करू नका. समाजाचे हाल झाल्यानंतर देऊ नका, द्यायचे असेल तर लवकर द्या. मुदत वाढत देत असताना एसीबीसी, कुणबी आणि ईडब्ल्यूएस हे तीनही ऑप्शन खुले ठेवा म्हणजे मराठ्याची पोरं मागे राहणार नाहीत. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांना म्हणजे मागेल त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं हे मार्गी लावा. आणि तीनही गॅजेट लवकरात लवकर लागू करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


शिंदे-पवार भेटीवर काय म्हणाले मनोज जरांगे? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या भेटीदरम्यान काय झालं हे मला सांगता येणार नाही. नेमकी त्यांची भेट कशासाठी झाली हेच मला माहित नाही. आरक्षणासाठी जर झाली असती तर बातमी बाहेर आली असती. सरकारचे प्रतिनिधी कोणी आले नाही तरी मला काही वाटत नाही आणि आम्ही त्यांना बोलवतही नसतो, असे त्यांनी यावेळी म्हटले.  


आणखी वाचा 


Manoj Jarange: मनोज जरांगेंची शुगर डाऊन, उपोषणस्थळी डॉक्टरांच्या पथकाने केली तपासणी, तब्येत खालावली