Manoj Jarange Patil On Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुरावे नष्ट करत असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही जबाबदार आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच अजित पवारांना देखील काही गोष्टी माहिती असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात, असा आम्हाला संशय आहे, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे आरोपी फरार करायला फिरत आहे. बाहेरचे आणि आतले आरोपी सांभाळताय. धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्यासाठी स्वत: काम करताय, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. धनंजय मुंडेंचीसुद्धा ईडी चौकशी लागली पाहिजे. हे पैसे कुठून आले? प्रॉपर्टी कुठून आली?, कोणत्या योजनेत भ्रष्टाचार केलाय?, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. धनंजय मुंडेंच्या टोळीने पुर्ण जात मातीत मिळवली, अशी टीकाही मनोज जरांगेंनी केली.
धनंजय मुंडे संघटित गुन्हेगारी घडवून आणतात- मनोज जरांगे
हे सगळे लाफडेबाज-घोटाळेबाज आहे. राज्याला लागलेले दुर्दैवी डाग आहे. गरिबांच्या ताटात माती कालवणे त्यांचा पिंड आहे. इतका भ्रष्टाचार एक मंत्री करत असेल तर त्याला सरकार जवळ करतं कसं? हा प्रश्न आहे. मी पण आता मागे लागणार आहे, मी पण सर्व बाहेर काढणार...त्याच्या टोळीने वाईट कृत्य केले आहे, मी सुट्टी घेऊन (रुग्णालयातून) आता टप्प्या-टप्प्याने कामाला लागणार आहे. धनंजय मुंडे संघटित गुन्हेगारी घडवून आणतात. त्यावर 302 दाखल करावे. तो सगळ्यांना सोबत घेऊन फिरतो. माझ्याकडे आला तेव्हा तो (कराड) सोबत होता, तो रोज सोबत आहे. त्याला माहित नाही का? हा (कराड) गुन्हेगार आहे म्हणून...धनंजय मुंडेंनी गुन्हे करण्यासाठी टोळ्या तयार केल्या आहेत. सगळे गुन्हे या टोळ्या करतात. या लोकांना धनंजय मुंडे वापरून घेतात, असं मनोज जरांगे म्हणाले. फक्त पैशांसाठी हा (धनंजय मुंडे) असा करतो... आणि सरकार या लोकांना सांभाळते.. पैसे वळवले ते खाण्यासाठीच असतील. शेततळे, घरकुल, विहिरी यांनी परळीत याचेही पैसे लाटले असं आम्हाला कळतंय, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.