Majha Maharashtra Majha Vision |  मेट्रो कारशेड ही जागा जंगलाचा भाग आहे. मुंबईतून वाहणारी मिठी नदी आरेमधून वाहते. आरेमध्ये विकामकामं करुन आपण मीठी नदीचा प्रवाह बंद करतोय. त्यामुळे आरेमध्ये विकामकामं करुन आपण पर्यावरणाची हानी केली असती. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड गेल्याने नागरिकांचा फायदाच होईल. मेट्रोचं जाळं जोडण्यासाठी कांजूरमार्गच्या जागेचा महत्त्वाची आहे. तसेच हजारो कोटी रुपये देखील सरकारचे वाचणार आहेत. चांगली कामं केली तर विरोधकांच्या पोटात का दुखतं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आदित्या ठाकरेंच्या हट्टामुळे हा निर्णय घेण्यात आला या विरोधकांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, जनतेच्या हितासाठी मी असे हट्ट करत राहणार. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.


समझने वालो को इशारा काफी है


विरोधक ठाकरे कुटुंबियांवर सातत्याने आरोप करत आहेत. याशिवाय शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारलं असता, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. 'समझने वालो को इशारा काफी है' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विरोधकांनी केंद्र सरकारला विचारलं पाहिजे आमच्या राज्याचे जीएसटीचे पैसे कधी मिळणार. देशात अनेक मोठ्या घडामोडी होत आहे. मात्र विरोधक लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.


विरोधकांच्या डोक्यात सतत सरकार अस्थिर करण्याचा विचार


विरोधकांचं व्हिजन सरकार गेल्याने धूसर झालं आहे. आमचं व्हिजन साफ आहे. आम्ही लोकांची सेवा करणार, जनहिताची कामं करणार, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विरोधकांच्या डोक्यात सतत सरकार अस्थिर करण्याचा विचार असतो. सतत निवडणूक लागावी असा त्यांचा विचार आहे. सरकारवर आरोप करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकांचा विश्वास महाराष्ट्र सरकारवर वाढत आहे, हे विरोधकांनी पाहिलं पाहिजे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं हे माझं काम नाही. लोकांना मदत करणे, त्यांच्या हिताची कामं करणे ही माझी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.


डोंबिवलीच्या प्रदूषणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डोंबिवली माझं आवडतं शहर आहे. सत्तांतर झाल्यानंतर डोंबिवलीचे रस्ते आम्ही सुधारण्यास सुरुवात करत इतर विकासकामंही हाती घेतली आहेत. डोंबिंवली किंवा इतर काही शहरांमधील प्रदूषणांचा विषय आम्ही हाती घेतला आहे. येत्या दोन-तीन वर्षात कायदेशीररित्या पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कंपन्या शहराबाहेर नेण्याबाबत विचार केला जाईल, असंही त्यांनी आश्वासन दिलं.