मुंबई : राज्यभरात आज जिल्हा परिषदेच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये लातूर, अमरावती, वर्धा, जालना यासारख्या जिल्ह्यांचा समावशे आहे. राज्यात महाविकास आघाडीतं सरकार स्थापन झालेलं असून सर्वाधिक जागांवर निवडून आलेल्या भाजपला विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागणार आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या निवडणूकांमध्येही भाजप विरूद्ध महाविकासआघाडी अशी चुरस पाहायला मिळाली. अनेक जिल्हांमध्ये भाजपला गड राखण्यात यश आलं तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने भाजपच्या नेत्यांना धूळ चारली आहे. एवढचं नाहीतर अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपला शिवसेनेने साथ दिल्याचंही पाहायला मिळालं आहे. पाहूयात राज्यभरातील जिल्हापरिषदेच्या निवडणूकांचा कौल...


वर्ध्यात भाजपचा विजय


राज्यपातळीवर भाजप आणि शिवसेनेत दुफळी दिसत असली तरी वर्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपला साथ दिली आहे. वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सरिता विजय गाखरे यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी भाजपच्याच वैशाली जयंत येरावार यांची निवड झाली आहे. त्यामुळं भाजपनं या निवडणूकीत विजय मिळवत वर्धा येथील सत्ता कायम राखली आहे. वर्धा जिल्हा परिषदेत 52 सदस्यसंख्या आहे. त्यात भाजपकडे आधीच 31 आणि एक रिपाई असं 32 संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेच्या दोन सदस्यांनीही भाजपला साथ दिली त्यामुळे अध्यक्षपदी सरिता गाखरे तर उपाध्यक्षपदी वैशाली येरावार 34 मतांसह विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उज्ज्वला देशमुख आणि उपाध्यक्षपदासाठी बसपाचे उमेश जिंदे यांना प्रत्येकी 18 मतं मिळाली आहेत. वर्धा जिल्हा परिषदेत भाजप महायुतीकडे भाजप 31 आणि रिपाई एक असे 32 संख्याबळ आहेय. त्यात आता शिवसेनेचे दोन सदस्य मिळाल्यान भाजपच संख्याबळ 34 झालं आहे. विरोधात काँग्रेसचे 13, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा प्रत्येकी दोन आणि शेतकरी संघटना एक असं 18 संख्याबळ आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारात विजयाचा जल्लोष करण्यात आला.


जालन्यात महाविकास आघाडीला यश


जालना जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीनं सत्ता काबीज केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे आणि उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ऐनवेळी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. अध्यक्षपदासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र भाजपकडून कोणताही अर्ज दाखल करण्यात आला नाही त्यामुळे अध्यक्ष पदाची ही निवडणूक बिनविरोध पार पडली. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी एकत्रित संख्याबळ राखून ठेवण्यात यश आलं आहे. परिणामी यावेळीही सत्ता राखण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे.


अमरावतीमध्ये महाविकासआघाडीचा अध्यक्ष-उपाध्यक्ष


अमरावती जिल्हा परिषदेत आज झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसनं बाजी मारली आहे, अध्यक्षपदी काँग्रेसचे बबलू देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठलराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. अमरावती जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पद काँग्रेस आणि शिवसेना या महाविकासआघाडीकडे गेला आहे. सद्यस्थितीत 57 सदस्यीय जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 13 सदस्य असल्याने ते सत्तासमिकरण जुळवू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून मागार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. या अमरावती जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे 26 आणि राष्ट्रवादीचे 5, शिवसेना 3, भाजप 13, प्रहार 5, युवा स्वाभिमान 2, बसपा-लढा-अपक्ष असे प्रत्येकी 1 सदस्य आहेत.


लातूरमध्ये भाजपने मारली बाजी


लातूरमध्येही जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून अध्यक्ष-उपाध्यक्षपद हे भाजपच्या पारड्यात गेलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे राहूल केंद्रे विजयी झाले असून उपाध्यक्षपदी भाजपच्या भारतबाई सोळुंके विजयी झाल्या आहेत.