नांदेड :  नांदेड जिल्हा परिषदेत बोगस पदभरती झाल्याचा खळबळजनक दावा खासगी संस्थेतील शिपायाने कागदपत्रांसह पुरावे देऊन केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


नांदेड जिल्हा परिषदेत डिसेंबर  2005 मध्ये 407 शिक्षणसेवकांची पदभरती (Nanded Zilla Parishad Education Department) करण्यात आली होती. या पदभरतीची संचिका अ दर्जाची असूनही, ही संचिका एका वर्षापासून जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागास सापडत नाही. शिक्षणसेवक पदभरतीची संचिका गहाळ झाल्याप्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 'आस' या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण संचालकांकडे केली आहे. 


'आस'च्या निवेदनाद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर तत्काळ चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी. त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. तसेच या आदेशाची प्रत जि.प. नांदेडच्या शिक्षणाधिकारी यांना कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी याच संचिका प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त सुरेश बेदमुथा यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आता शिक्षण संचालकांनीही या  प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याने 'संचिका गहाळ' प्रकरण वरचेवर गंभीर  होत चालल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे. त्यातच नांदेड शहरातील नरहर कुरुंदकर हायस्कूल मधील सेवकाने मोठा गौप्यस्फोट केलाय. 


 1990 पासून नरहर कुरुंदकर शाळेवर सेवक पदावर कार्यरत असणारे रमेश खंडोजी लांडगे यांना 2014 साली विनाअनुदानित वरून अनुदानित असणाऱ्या नरहर कुरुंदकर हायस्कूलवर रुजू करून घेण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी पत्रव्यवहार करून रुजू करून घेण्याचे आदेशही दिले आहे. मात्र अद्याप सात वर्षा पासून लांडगे यांना या पदावर रुजू करून घेण्यात आले नाही. लांडगे यांच्या सारखे अनेकजण अशा प्रकारे भरती करण्यापासून डावलून जिल्हा परिषदेने बोगस नोकर भरती केली व नंतर ही संचिका जिल्हा परिषदेने गहाळ केल्याचा खळबळजनक आरोप लांडगे यांनी केलाय.


त्यामुळे या आरोपावरून म्हाडा पेपरफुटी, शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य भरती घोटाळ्या सारखा घोटाळा नांदेड जिल्हा परिषदेतही झाला नाही ना अशी शंका उपस्थित होते आहे.


महत्वाच्या बातम्या