Zika Virus : महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी झिका विषाणूच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे.


गर्भवतींसाठी विशेष सूचना


राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. झिका विषाणू संसर्ग झालेल्या गरोदर महिलांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे आदेश असून, राज्यांनी बाधित भागातील आरोग्य सुविधा केंद्रांना झिका विषाणू संसर्गासाठी गरोदर महिलांची तपासणी करण्याचे आणि विषाणू संसर्ग झालेल्या मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.


आरोग्य सुविधा आणि देखरेख


आरोग्य सुविधांनी आपल्या परिसरात एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम स्थळे, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम जास्तीत जास्त  प्रमाणात राबविण्याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


जनजागृती आणि आयईसी संदेश


समाजामध्ये भीती कमी करण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी समाजमाध्यमे आणि इतर मंचांवर सावधगिरीचे आयईसी संदेश देण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. झिका विषाणूचा संबंध गर्भाच्या वाढीशी असल्याने विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


झिका विषाणू चाचणी सुविधा


झिका चाचणी करण्याची सुविधा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV), पुणे, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), दिल्ली आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या निवडक विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे.


झिका विषाणू विषयी माहिती


झिका हा डेंग्यू आणि चिकुन गुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार विशेष घातक नसला तरी झिका प्रभावित गर्भवती महिलांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या मायक्रोसेफली (मेंदूचा आकार लहान असणे) या स्थितीशी संबंधित आहे. भारतात 2016 मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. 2024 मध्ये (2 जुलैपर्यंत) महाराष्ट्रात पुणे (6), कोल्हापूर (1) आणि संगमनेर (1) येथे झिका विषाणूच्या 8 रुग्णांची नोंद झाली आहे.