नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आणि याच दृष्टीनं आता युवासेनेकडून तरुणांना शिवसेनेकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. युवासेनेने निवडणुकीचं शिवधनुष्य हाती उचलत आज नवी मुंबईत युवा सेनेचा पदाधिकारी मेळावा घेतला.
महाराष्ट्रामधील भाजपाचे अनेक युवा नेते आता युवा सेनेत येण्यास उत्सुक असून येत्या काही दिवसात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित त्यांना प्रवेश देणार असल्याचे सूचक विधान युवा सेना नेता वरूण सरदेसाई यांनी केले आहे. भाजपाला गळती लागणार असल्याने येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका येत्या तीन महिन्यात लागणार असल्याने युवा सेनेचा पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरूण सरदेसाई, खासदार राजन विचारे उपस्थित होते.
यापुढे 18 ते 35 वयोगटातील मतदार राजाची विशेष जबाबदारी युवा सेना उचलणार असून त्यांच्यापर्यंत सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि भाजपाने वाढविलेल्या महागाईचा जाहीरनामा देणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देशात प्रतिमा चांगली झाली असून ती लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन यावेळी युवा सैनिकांना करण्यात आले.
2019 च्या निवडणुकांनतर राज्यात शिवसेना भाजपपासून दूर झाली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. 2019 ची घटना भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. राज्यातला बदल झाल्यानंतर वर्षानुवर्ष मुंबई महानगरापालिकेवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेला दणका देण्यासाठी भाजपसोबत, मनसे, काँग्रेसही सज्ज झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत तयारी सुरु केली आहे.
शिवसेनेची शाखा हा शिवसेनेचा जीव मानला जातो. याच शाखेतून सैनिक प्राणावायू घेतो आणि तयारीला लागतो. त्यामुळे निवडणुकांची तयारी ही शाखेतूनच केली जाते. सैनिकांना चार्ज करून, आढावा घेण्याचं काम सध्या आतून सुरु आहे.
शिवसेनेने महानगरपालिकेसाठी टीम्स तयार केल्या आहेत. शिवसेनेतले आमदार, खासदारांमध्ये निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे निरीक्षक शाखां-शाखांमध्ये जाऊन आढावा घेत आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची युवासेना शाखा शाखा पिंजून काढतेय. युवा सेनेतले पदाधिकारी शाखेतल्या युवा टीम मजबूत करत आहेत. महिला आणि युवा मुलींची टीम शाखेतल्या महिलांचा सहभाग वाढवत आहेत.