नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 05:07 PM (IST)
प्रातिनिधीक फोटो
नांदेड : नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान दोन ते तीन कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या. यावर ''तुम्ही फोटो काढून तुमचं काम पूर्ण करुन घ्या'', अशा शब्दात घोषणा देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने घोषणा देणाऱ्यांसह उपस्थितांनाही आश्चर्य वाटलं. मात्र, मराठा समाजाला आरक्षण फक्त भाजप सरकारच देऊ शकेल, असंही सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यातील नरसी इथे मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री आपल्या भाषणात शिवसेना आणि काँग्रेसवर टीका करतील, असा अंदाज लावला जात होता. मात्र त्यांनी शेतकरी योजनांवरच आपलं भाषण आटोपून घेतलं.