पुणे : पुण्यातील कॅम्प भागात झालेली कॅप्टन रवींद्रकुमार बाली यांची हत्या सिगारेट पेटवायला काडेपेटी दिली नाही म्हणून झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी रॉबीन अँथोनी लाझरस नावाच्या एकवीस वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
रॉबीन लाझरस हा एका बीपीओ सेंटरमध्ये काम करणारा असून एक फेब्रुवारीच्या मध्यरात्री तो दारू पिऊन त्याच्या मोटार सायकलवरुन निघाला होता. कॅप्टन रवींद्रकुमार बाली हे कॅम्प परिसरात रस्त्याच्या कडेला एका तंबूमध्ये रहात होते.
रॉबीन लाझरसची गाडी क्यांप परिसरात बंद पडली. त्यानंतर त्याने सिगारेट पेटवण्यासाठी रस्त्याच्या कडेला तंबूमध्ये झोपलेल्या कॅप्टन रवींद्रकुमार बाली यांना उठवून त्यांच्याकडे काडेपेटी मागितली. मात्र बाली यांनी काडेपेटी देण्यास नकार दिल्याने चिडून रॉबीन लाझरसने फुटपाथच्या कडेला असलेली सिमेंटची वीट बाली यांच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये 65 वर्षीय बालींचा मृत्यू झाला.