आमदाराच्या गणेश मंडळाची आर्चीसाठी वीजचोरी, तरुणाला शॉक
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 04:49 PM (IST)
नागपूर : 'सैराट'मधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरुच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने आकडा टाकून घेतलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन तरुण गंभीर जखमी झाला आहे. नागपूरमधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गणपती विसर्जन कार्यक्रमासाठी रिंकू राजगुरुला आमंत्रित केलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश गजभिये यांच्या कार्यकर्त्यांनी आकडा टाकून वीज चोरली होती. आर्ची आल्याने कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. पण वीज घेताना जी तार वापरली होती, त्याला स्पर्श झाल्याने एका तरुणाला जोरदार झटका बसला आणि तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तातडीने या तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु सरसकट वीजचोरी करणाऱ्या प्रकाश गजभिये यांच्यावर किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सेलिब्रिटींना आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे आमदार कार्यक्रमासाठी मात्र वीज चोरतात. त्यामुळे ऊर्जा मंत्र्याच्या जिल्ह्यातील पॉलिटिकल वीजचोरीवर महावितरण कारवाई करेल का? हा प्रश्न आहे.