मुंबई: पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा पडलेला असताना आता याच मुद्यावरुन राजकारणही तापू लागलं आहे. एकट्या पालघरमध्ये १५ दिवसात 3 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे.

या मृत्युंना आदिवासी विभागासोबतच महिला आणि बालकल्याण विभागही जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे कुपोषणाच्या मुद्याआड मुडेंनी राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

आता पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंच्या आरोपांना नेमकं कशाप्रकरे उत्तर देतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. रविवारी धनंजय मुंडे ठाण्यातील आदिवासी भागाचा दौरा करणार आहेत. तर विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील सोमवारी आदिवासी भागाचा दौरा करतील.

दरम्यान आपण दौऱ्यावर असल्यानं पीडित कुटुंबियांची भेट घेण्यास उशीर झाल्याची कबुली आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरांनी दिली.

30 ऑगस्ट रोजी वाडा तालुक्यातील सागर वाघ या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाचा कुपोषणानं मृत्यू झाला होता. मात्र, पालकमंत्री विष्णू सवरा तब्बल 15 दिवसांनी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले. यावेळी मयत मुलगा सागर वाघच्या आईनं विष्णु सवरा यांना दारातूनच परतावून लावलं. जिल्ह्यात 7 हजार कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल 600 मुलांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील


 

संतप्त मातेनं मंत्री विष्णू सवरांना दारातूनच हाकललं!