सेल्फीच्या नादात तरुण आंबोली घाटाच्या दरीत कोसळला
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2018 05:48 PM (IST)
संपत महाले (वय 35) असं या व्यक्तीचं नाव असून ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे रहिवासी आहेत. संपत महाले कुटुंबासमवेत गोवा ते नाशिक असा प्रवास करत होते.
सिंधुदुर्ग : आंबोली येथे सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन एक जण 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. संपत महाले (वय 35) असं या व्यक्तीचं नाव असून ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे रहिवासी आहेत. संपत महाले कुटुंबासमवेत गोवा ते नाशिक असा प्रवास करत होते. यावेळी आंबोली घाटात सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. सहा ते सात वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी आंबोली घाटात दरड कोसळली होती, त्याच ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या संपत महाले यांचा पाय घसरुन ते आंबोली घाटात पडले. दरम्यान, गेल्या तासाभरापासून शोधमोहीम सुरू आहे. अद्याप हाती काही सापडलेलं नाही. आंबोली घाटातील दरीत शोध सुरु आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्या ठिकाणी पर्यटकांना 'थांबू नये, दरड कोसण्याची भीती आहे' असे फलक लावलेले आहेत. तरीही पर्यटक या ठिकाणी थांबून त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.