जालना : अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटात नायिका म्हणून काम करण्याची संधी देण्याचं आमिष दाखवून जालना शहरातील एका तरुणीला नाशिक येथील एका आरोपीने साडेचार लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने जालना पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी या तोतया दिगदर्शकाला नाशिक येथून अटक केली आहे.


हर्षद सपकाळ असे या आरोपीचे नाव असून, सदर आरोपीने बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याबाबत एका इंग्रजी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या आधारे जालन्यातील तरुणीने दिल्लीचा पत्ता असलेल्या IMPCT फिल्म नावाच्या कंपनीशी फोनवरुन संपर्का केला. याच कंपनीच्या नावाने सदर आरोपींनी या युवतीला विश्वासात घेऊन पैशांची मागणी केली होती.

दरम्यान, चित्रपटात काम मिळण्याच्या आमिषाने या युवतीने वेळोवेळी पैशांची पूर्तता केली. मात्र पुढे कुठेही संधी मिळत नसल्याचे मुलीच्या लक्षात आल्याने तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या आरोपीला अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.