पुणे: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊन भर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. नगररोडवरील शिक्रापूर चौकात ही घटना घडली.

 

श्रीकांत लोंढे असं मारहाण करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.

 

श्रीकांतचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होतं. लग्नाचं आमिष दाखवून तीच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र मुलीला दिवस जाऊनही श्रीकांतने लग्न न केल्याने, तसंच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्याने, या तरुणाला चोप दिल्याचं, तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

 

मात्र तृप्ती देसाईंना कायदा हातात घेऊन तरुणाला मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न पडतोय. खऱं तर तृप्ती देसाईंनी या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं, मात्र भरचौकात मारहाण करुन कायदा हातात घेतला आहे.

 

तृप्ती देसाईंचं स्पष्टीकरण

कायद्यावर आमचा विश्वास आहे, मात्र फुल्लटाईम गृहमंत्री नसलेल्या राज्यात कायद्यासाठी खूप सहन करावं लागत आहे. संबंधित तरुणाने मुलीला गर्भपात करायला लावला, पण तरीही तो लग्नास टाळाटाळ करत होता. आम्ही तरुणाच्या घरी जाऊन विचारणा केली. मात्र मुलगी वेगळ्या जातीची असल्यामुळे लग्न करणार नाही, पैसे देऊन हे प्रकरण मिटवू, असं तरुणाकडून सांगण्यात आल्याने, आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. त्यामुळेच त्या नराधमाला चौकात नेऊन बदडावं लागलं, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

 

याशिवाय संबंधित तरुणाने अन्य दोन मुलींनाही असंच आमिष दाखवून त्यांच्याशी शरिरसंबंध ठेवल्याचा दावा, तृप्ती देसाईंनी केला आहे.

VIDEO: