रत्नागिरी : उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग! ही म्हण आपल्या सर्वांना माहित आहे. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात मात्र कोरोना पॉझिटिव्ह नवरा, गुडघ्याला बाशिंग असा प्रकार घडला आहे. कोरोना बाधित असताना देखील नवऱ्याला लग्न करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींच्या चिंतेत देखील भर पडली आहे. 


गुहागर तालुक्यातील सडे- जांभारी येथील तरुणाचा 4 मे रोजी कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. पण त्यानंतर देखील या तरुणाने बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. पाच मे रोजी या तरूणाने लग्न देखील केलं. शिवाय, कोरोना काळातील सारे नियम देखील मोडले. घडला प्रकार समोर आल्यानंतर मात्र शीर गावच्या ग्रामकृतीदलाची पुरती धावधाव झाली. त्यानंतर नवरदेवाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पण, असं असलं तरी लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्याचं काय हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. दरम्यान, जिल्ह्यातील सध्याची सारी परिस्थिती पाहता या नवरदेवाच्या उतावळीपणामुळे सध्या अनेक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. 




प्रशासनाचं दुर्लक्ष?


मुळात नवरदेवाचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट हा 4 मे रोजी आला होता. असं असताना देखील त्याला रूग्णालयात दाखल का करण्यात आलं नाही? तब्बल 24 तासानंतर देखील आरोग्य यंत्रणा काय करत होती? लग्नाला 25 वऱ्हाडी बंधनकारक असून दोन तासात लग्नविधी संपवणे अपेक्षित आहे. असं असताना देखील या लग्नाना परवानगी का दिली गेली? शिवाय, कोरोना रिपोर्टनंतर आरोग्य यंत्रणेसह ग्रामकृती दल नेमकं काय करत होतं? यासारखे अनेक प्रश्न जनसामान्यांमधून विचारले जात आहे. 


तसेच केवळ 50 हजार रूपये दंड केला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही? हा सवाल देखील अद्याप अनुत्तरीत आहे. यापुढे लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींना शोधून काढत त्यांना क्वॉरंटाईन केलं जाणार का? त्यांची तपासणी केली जाणार का? याबाबत प्रशासनानं काय कारवाई अथवा काय निर्णय घेतला आहे? याबाबत देखील सध्या सवाल विचारले जात आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजाराच्या पार गेला आहे. मृतांची संख्या देखील वाढत आहे. या साऱ्या परिस्थितीत हलगर्जीपणा केल्यानं प्रशासन दोषी नाही का? याबाबत आता कुणाला जबाबदार ठरवणार? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं अद्याप बाकी आहे.