अहमदनगर : योगगुरु रामदेव बाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळबाजांवर एकाच वेळी वार आणि प्रहार केला असू, मोठ्या राक्षसांविरोधात मोदींनी युद्ध पुकारलं असल्याचं रामदेव बाबा म्हणाले. शिवाय, मोदी हिंमत हरणारे नसून देश त्यांच्या बरोबर असल्याचंही रामदेव बाबा यांनी म्हटलं.
राष्ट्रभक्तीचं आणि राष्ट्राला शक्ती देणारं अभियान असून कोणतंही राजकारण करु नये, असं अवाहनही त्यांनी केलं. अहमदनगरला ते योग शिबीरात बोलत होते. यावेळी रामदेव बाबांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं.
या माध्यमातून 10 लाख कोटी काळा पैसा बाहेर पडेल. हे पैसे देशाच्या अर्थव्यवस्थेत आल्यास देशाची अर्थव्यवस्था चीन पेक्षा जास्त होईल. तर येत्या पाच-सात वर्षात आपण अमेरिकेला टक्कर देऊ, असंही त्यांनी म्हटलं. यामुळे देशाचा जीडीपी वाढून विकास वाढेल. सर्वांचं उत्पन्न वाढेल त्याचबरोबर डॉलर आणि पौंडच्या तुलनेत रुपये मजबूत होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
देशाच्या विकासासाठी बाहेरुन पैसा आणण्याची गरज नाही. देशात मोठ्या प्रमाणात पैसा आहे. त्याचबरोबर आतंकवाद, नक्षलवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार, नकली पैसा, राजकीय आणि ड्रग माफियांचा पर्दाफाश झालाय. त्यामुळं देशाचं भविष्य बदलणार असून सर्वांच्या सहकार्यांची गरज रामदेव बाबांनी व्यक्त केलीय.