Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण, कधी ढगाळ वातावरण (Weather) होत आहे, तर कधी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. तर काही भागात अद्यापही पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिनही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


भंडारा जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची हजेरी, शेतीच्या खरीप हंगामाला येणार वेग


दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसानं पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे. मोहाडीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली तर भंडारा शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुठं हलक्या तर, कुठं मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावला आहे. मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं भात नर्सरीला जीवनदान मिळणारं असून भात लागवडीला आता वेग येणार आहे. 


 पाऊस पडत नसल्याने पिके लागली करपू, रेन पाईपद्वारे पिकांना पाणी देण्याची वेळ


जून महिन्यात मुसळधार पडलेल्या पावसाच्या जोरावर नाशिकच्या मनमाड, नांदगाव या भागात पेरण्या उरकण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने आता शेतातील पिके करपू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीला पाणी आहे, त्या शेतकऱ्यांना रेन पाईपद्वारे पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. मात्र, ज्यांच्याकडे विहिरीला पाणी नाही त्या शेतकऱ्यांचे पिके मात्र आता करपू लागली आहेत.


धाराशिवमध्ये जोरदार पाऊस


धाराशिव शहरासह परीसरात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. चार दिवसाच्या प्रतिक्षेनंतर जोरदार पाऊस सुरु आहे. पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे. तर प्रकल्पातील पाणीपातळीतही वाढ होणार आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्याने नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर